कोणाला हरवून नाही तर सर्वांना सोबत घेऊन जगणारा जनसाहित्यिक : बंडोपंत बोढेकर
- लक्ष्मण खोब्रागडे
 
                यशस्वी तोच होतो ,जो   स्वतःबरोबर इतरांना सोबत घेऊन  जातो . इतरांना मोठे केले की , आपली उंची आपोआप वाढत जाते . इतरांच्या यशात वाटाड्याची भूमिका घेऊन समाधानाची तृप्तता अनुभवायला विशाल अंतःकरण लागते . अशी विशाल हृदयाची माणसे मातीत उगवून आकाशापर्यंत पोहचतात . त्यांच्या छत्रछायेत कित्येकांच्या यशाच्या मालिका दडलेल्या असतात . त्यांच्या सहवासात न हरण्याची भीती ना अपयशाचे शल्य असते , फक्त जीवनाचा प्रत्येक क्षण सत्कारणी लागल्याची आत्मिक अनुभूती मनाला नवी उभारी देत असते . त्यासाठी परिस बनून प्रयत्नाचे सोने बनवणारा हात पाठीशी असावा लागतो . असाच इतरांना यशाचे गमक सांगत नवी ओळख निर्माण करून  देणारा मार्गदर्शक म्हणून जनसाहित्यिक बंडोपंत बोढेकर कित्येकांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे अपूर्व कार्य करीत आहेत.
               राष्ट्रसंताचे विचार घेऊन झाडीबोलीच्या चळवळीत ध्रुवताऱ्याप्रमाणे काम करणाऱ्या ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी साहित्य क्षेत्रात कित्येकांना प्रसिद्धी मिळवून दिली ; यापेक्षा हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्वतयारीपासून आयोजनापर्यंत प्रत्येक  क्षण स्वतःला झोकून देणारे तळमळीचे व्यक्तिमत्त्व मी जवळून अनुभवले आहे . कार्यक्रम कोणाचा आहे यापेक्षा त्या कार्यक्रमाची यशस्वीता बोढेकर सरांना स्वस्थ बसू देत नाही , यासाठी संस्काराने मिळवलेला परोपकारी काळीज प्रत्येकालाच लाभत नाही . त्यासाठी स्पर्धेच्या युगातील कोती मानसिकता सोडून , ग्रामगीतेच्या सारातील एकोपा टिकवण्याची किमया शिकावी ती ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्याकडून . झाडीच्या गर्भात दडलेली अनेक रत्ने शोधून त्यांना पैलू पाडण्याचे पुण्यकर्म बोढेकर यांच्या हातून घडत आहे . स्वार्थापलीकडे परमार्थाचा अध्याय बंडोपंत यांच्या व्यक्तिमत्वाची उंची वृद्धिंगत करीत आहे . स्वतः साहित्यिक असले तरी इतरांतील साहित्यिक जागृत करण्याचे संजीवन बंडोपंत बोढेकर यांच्या रूपाने झाडीबोलीला प्राप्त झाले आहे .
                प्रपंच , व्यवसाय , साहित्य , समाजसेवा ,प्रबोधन आणि विविध क्षेत्र सांभाळत राष्ट्रसंताचे कार्य गावोगावी पोहचविण्याची त्यांची उर्मी बोढेकरांच्या व्यक्तिमत्वाचा तेज प्रसवते . या तेजाने कित्येक चळवळी पावन झाल्या आहेत . हरविणे नाही तर इतरांना सोबत घेऊन जगणे हाच ज्यांच्या जीवनाचा ध्येय आहे , असे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर आज जनसाहित्यिक म्हणून आम्हाला प्रेरक आहेत . मायेची ममता घेऊन यशाचा घास भरवणाऱ्या या अवलीयाला दीर्घायुष्य लाभून आम्हाला सदोदित चैतन्यमय सहवास लाभो , हीच निर्मिकचरणी वंदना ।

🙏लक्ष्मण खोब्रागडे🙏
जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर
९८३४९०३५५१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]