श्री.कुशाबराव कायरकर, वृक्षवेडा इरई पुत्र व पर्यावरणवादी पिता...

श्री.कुशाबराव कायरकर,
वृक्षवेडा इरई पुत्र व पर्यावरणवादी पिता...

- पप्पू देशमुखकायरकर साहेब हे चंद्रपूरच्या पंजाब नॅशनल बँकेतील एक कर्मचारी. योगायोगाने 27 वर्षांपूर्वी 5 जूनला पर्यावरण दिनी त्यांच्या मुलाचा जन्म झाला. मुलगा अजिंक्य याच्या जन्मदिनी  वृक्षारोपणाच्या कामाला सुरुवात केली. त्यासाठी वृक्षाई या संस्थेची स्थापना केली.मागील 27 वर्षांपासून वृक्षारोपणाचे कार्य अविरत सुरू आहे. चंद्रपूरच्या वरोरा नाका चौक, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन,बस स्टॅन्ड, सामान्य रुग्णालय इत्यादी गर्दीच्या ठिकाणी शेकडो वृक्ष त्यांनी लावली. लावलेले वृक्ष जगवण्यासाठी स्वतःच्या  टू-व्हिलर गाडीवर बकेट आणि मग घेऊन मिळेल तिथले पाणी झाडांना टाकले.आता मोठी झालेली ही झाडे दररोज हजारो लोकांना सावली देत आहेत, पर्यावरणाच्या समृद्धीमध्ये  हातभार लावत आहेत. लहान मुलीचा जन्म 1 जुलै 2007 रोजी झाला. एक जुलै जागतिक कृषी दिन. पर्यावरणवादी पित्याच्या कुटुंबातील हा दुसरा योगायोग. मुलीचे  नाव 'भूमी' ठेवले. एक प्रकारे नावातूनच तिला पर्यावरणाच्या कामाचा वारसा दिला. अशाप्रकारे या वृक्षवेड्या माणसाने अख्खे कुटुंब व आसपासच्या सर्व आप्त स्वकीयांना वृक्षारोपणाच्या कामाला लावले.
इरई पुत्र ही या माणसाची पुन्हा एक ओळख.आणि इरईची स्वच्छता व खोलीकरण ही या माणसाची दुसरी लढाई. यासाठी जमेल त्या पद्धतीने शासन- प्रशासना पर्यंत आवाज पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दरवर्षी जागतिक जलदिनानिमित्त 23 मार्च ला लोकांची दिंडी घेऊन दाताळा रोडवरील इरई नदीच्या पात्रात पूजन करायचे व इरई नदीची स्वच्छता तसेच खोलीकरणाची मागणी लावून धरायची हा अनेक वर्षांपासूनचा उपक्रम.
हा पठ्ठा दोन वर्षांपूर्वी नोकरीतून सेवानिवृत्त झाला.पण थांबायचे नाव नाही. 
आजही 5 जून 2023 रोजी चंद्रपूरच्या बायपास रोड वरील नवनिर्मित मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू आहे.श्री.कायरकर साहेब खड्डे खोदण्यापासून पाणी टाकण्यापर्यंत सर्व व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत. 
आजपर्यंत कोणत्याही प्रथितयश संस्थेने त्यांच्या कामाची दखल घेऊन साधा सत्कार केला किंवा एखादा पुरस्कार दिला असं आठवत नाही. कारण तेवढं ग्लॅमर कुशाबराव यांच्यामध्ये निश्चितपणे नाही. त्यांच्या कामात मात्र पुढील अनेक पिढ्यांचे जीवन समृद्ध करणारे ग्लॅमर आहे.
अशा या वृक्षवेड्या इरई पुत्राला पर्यावरण दिनानिमित्त मानाचा मुजरा !

... पप्पू देशमुख,चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]