जागतिक युवा कौशल्य दिवस संपन्न : कौशल्य विकास कार्यात योगदानाबद्दल प्राचार्य मेहेंदळे, अजय चंद्रपट्टण,मुंजनकर सन्मानित


आवडीचा स्वयंरोजगाराभिमूख व्यवसाय निवडून त्यात   विशेष कौशल्ये आत्मसात करावे - रणजित यादव 

चंद्रपूर (प्रतिनिधी)- 
   
 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे आयोजन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय सभागृहात करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी रणजीत यादव यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य रवींद्र मेहेंदळे  होते .  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे,  कॅरिअर मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत,  श्रीमती भाग्यश्री वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
  याप्रसंगी रणजित यादव म्हणाले,  स्पर्धा परीक्षेत एखाद्या वेळी आपल्याला यश न मिळाल्यास विद्यार्थ्यांनी निराश न होता आपल्या आवडीच्या कलाक्षेत्रात किंवा एखादा आवडीचा व्यवसाय निवडून त्यात कौशल्ये प्राप्त करावीत.  उत्तम व्यवसाय कौशल्य प्राप्त केल्यास जीवनाला नवी दिशा मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले.
    भैय्याजी येरमे यांनी युवा कौशल्य दिनाचे महत्त्व समजावून देत आजच्या काळात असलेली रोजगारांच्या संधी यावर प्रकाश टाकला तर  २१ व्या शतकातील तरुणांना उद्योजकता संधी या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन अजय चंद्रपट्टण यांनी केले . कार्यक्रमाध्यक्ष  रवींद्र मेहेंदळे यांनी विद्यार्थ्यांची  उद्योजकीय मानसिकता  तयार करण्यासोबतच  त्यांचेवर पालकांकडून  मानवतावादी  संस्कार देण्याची गरज यावर जोर दिला . याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यात कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता संबंधित प्रभावी प्रचार प्रसाराचे उत्तम कार्य केल्याबद्दल एमजेएनफ फेलो श्री . अजय चंद्रपट्टण आणि कौशल्य विकास कार्यालयाचे जिल्हा समन्वयक मुकेश मुंजनकर यांना  विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागात उत्तम कार्य केल्याबद्दल कु. रिया पिपरीकर आणि कु. कोमल बावरे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  जिल्हास्तरीय छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे उत्तम आयोजन केल्याबद्दल प्राचार्य रवींद्र मेहेंदळे यांचाही विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर  यांनी केले तर मुकेश मुंजनकर यांनी आभार मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गटनिदेशक रमेश रोडे, महेश नाडमवार , उज्वल कोठारकर तसेच रासेयोच्या स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]