पन्नालाल सुराणा आज ९० वर्षाचे झाले.... Pannalal Surana

पन्नालाल सुराणा आज ९० वर्षाचे झाले....


आजच्या तत्वहीन राजकारणात एकाच विचारांवर निष्ठा ठेवून जगलेले ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा हे आज ९ जुलै रोजी वयाची ९० वर्षे पूर्ण करत आहेत.नष्ट होणाऱ्या प्रजातीतील या काही शेवटच्या वनस्पती! त्यांचा परिचय करून देणारा ख्यातनाम लेखक, विचारवंत हेरंब कुलकर्णी यांचा हा लेख.

विश्वनाथ प्रतापसिंह VP Singh हे पंतप्रधान असताना त्यांनी या कार्यकर्त्याला राज्यपाल होण्यासाठी पत्र पाठवलं.‘मला सर्वसामान्य माणसांत काम करायचं आहे...तेव्हा, मला राजभवनाच्या राजशिष्टाचाराच्या बंधनात अडकवू नका,’ असं नम्रपणे सांगत त्यांनी राज्यपालपद नाकारलं. हे नि:स्पृह कार्यकर्ते आहेत पन्नालाल सुराणा. येत्या नऊ जुलैला ते नव्वदीत प्रवेश करत आहेत. सुराणा (९४२३७३४०८९) यांचं गाव बार्शी. जन्म १९३३ मधला. लहानपणापासून सेवा दलाच्या शाखेत त्यांची वैचारिक जडणघडण झाली. पुण्यात उच्च शिक्षणाला गेल्यावर शंकरराव देव, अ.भि.शहा यांच्या ‘समाजप्रबोधन’ संस्थेचं सचिवपद तरुण वयात त्यांच्याकडे आलं. संस्थेमार्फत त्यांनी अनेक पुस्तकं प्रसिद्ध केली. जयप्रकाश नारायण यांच्या विनंतीवरून सुराणा व बापू काळदाते यांना बिहारला पाठवण्यात आलं. २१ वर्षांच्या सुराणा यांना त्या वेळी जयप्रकाश यांचा मिळालेला सहवास आणि बिहारचं समाजवास्तव यामुळे त्यांच्यातील कार्यकर्ता विकसित झाला. भूदानात मिळालेल्या जमिनींचं वाटप भूमिहीन मजुरांना करण्याची जबाबदारी जयप्रकाश यांनी त्यांच्यावर सोपवली. सुराणा यांनी तीन वर्षं कष्ट घेऊन हे काम पूर्ण केलं. विनोबा भावे Vinoba Bhave यांच्या ‘भूदानचळवळी’तही त्यांनी भाग घेतला. सुराणा यांनी डॉक्टर वीणा यांच्याशी आंतरजातीय विवाह केला. डॉक्टर वीणा यांनी मुलींच्या शिक्षणासाठी व आरोग्यासाठी काम केलं. त्यांच्या पाठिंब्यानं सुराणा पूर्ण वेळ काम करू शकले.

एसटी महामंडळाचा प्रश्न अलीकडे गाजला; पण १९६७ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांची संघटना उभारून सुराणा यांनी या कामगारांच्या प्रश्नांवर आंदोलनं करून तुरुंगवास भोगला. ‘एक गाव, एक पाणवठा’, तसंच हमालांच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. आणीबाणीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांना अटक झाली. त्या काळात वेषांतर करून ते मुंबईत राहिले. कार्यकर्त्यांना संदेश देणारी पत्रकं त्यांनी पोहोचवली. पोलिसांना चुकवत ते लोकांना संघटित करत राहिले; पण अखेर अटक झाली. भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनी मिळवून देताना व इतर प्रश्नांवर सात वेळा त्यांना कारावासात जावं लागलं.सामाजिक प्रश्नांबाबत काम करणारे सुराणा यांची राजकीय कारकीर्द महत्त्वाची आहे. सन १९६३ मध्ये ‘प्रजा समाजवादी पक्षा’चे प्रांतिक सरचिटणीस म्हणून देशपातळीवर काम करणारे राममनोहर लोहिया, कर्पुरी ठाकूर, नाथ पै अशा नेत्यांबरोबर सुराणा यांनीही देशपातळीवर काम केलं. आणीबाणीनंतर जनता पक्ष सत्तेत आला. या सत्ताधारी पक्षाचे ते सरचिटणीस होते. इतकं महत्त्वाचं पद असूनही सुराणा यांना मंत्रिपदाचं आकर्षण वाटलं नाही. समाजवादी जनआंदोलन, ‘सोशालिस्ट फ्रंट’चं काम करत सन २०११ मध्ये वयाच्या अट्ठ्याहत्तराव्या वर्षी त्यांनी समाजवादी पक्षाची बांधणी पुन्हा सुरू केली. देशभर प्रवास करत समाजवादी पक्ष पुन्हा सक्रिय केला. राजकीय काम करताना दुसरीकडे राष्ट्रसेवा दलाचं अध्यक्षपद व ‘मराठवाडा’ या दैनिकाचं संपादकपद अशा दोन जबाबदाऱ्याही आल्या. राष्ट्रसेवा दलाचा सुवर्णमहोत्सव त्यांच्या कारकीर्दीत आल्यानं त्यांनी कामाचा मोठा विस्तार केला. सन १९९० मध्ये ५४ लाख इतकी मोठी रक्कम ‘कायम निधी’ म्हणून जमा केली. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रवास केला व हे करताना एक वृत्तपत्रही चालवलं.मराठवाड्यात सन १९९३ मध्ये झालेल्या भूकंपानं पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अनाथ झालेल्या मुलांचा प्रश्न खूपच मोठा होता. त्या मुलांसाठी त्यांनी ‘आपलं घर’ हा निवासी प्रकल्प उभारला. त्यातून आजपर्यंत हजारो अनाथ मुलांना मायेची ऊब मिळाली. एक कोटी रुपयांचा कायमस्वरूपी निधी उभारण्यात आला आहे. आजही सुराणा त्याच ठिकाणी राहतात. परांडा तालुक्यात आसू या गावाजवळ रुई दुधी परिसरात असलेली २१ एकर गायरान जमीन त्यांना मिळाली. तिथं ‘शेती व ग्रामीण विकास संशोधन मंडळ’ ही संस्था स्थापन करून त्यांनी अनेक विकासकामं केली. त्या दुष्काळी गावात पाच हजार विविध झाडं लावली व जगवली. शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केलं. रोपवाटिका करून रोपं शेतकऱ्यांना वाटली. तलाव केले. धरणग्रस्त लोकांना मोबदला मिळवून दिला. सुराणा यांचे सहकारी विलास वकील यांनी याच संस्थेच्या वतीनं ४२ गावांत तीन हजार एकल महिलांचं संघटन उभं केलं. त्या काळात झालेला हा पहिलाच प्रयोग होता. एकल महिलांचे प्रश्न संस्थेनं सोडवले. १०० गावांत शेळीपालन प्रशिक्षण दिलं. पाणलोटाचंही मोठं काम संस्थेनं केलं.ही कामं सुरू असताना सुराणा हे भारतभर फिरत राहिले. बिहारसारख्या राज्यात ते किमान २५ वेळा जाऊन आले. नागालँड, तेलंगण, उत्तर प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतही ते नेहमी जातात. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व तालुक्यांना त्यांनी भेटी दिल्या असाव्यात. सर्व प्रवास ते एसटीनं व रेल्वेनं करतात.याविषयी विलास वकील गमतीनं म्हणतात, ‘एसटी, रेल्वे आणि पोस्ट यांचा इतका प्रचंड वापर क्वचितच कुणी केला असेल.’पहाटे उठून ते रोज किमान ५० पोस्टकार्डं लिहितात. त्यातून देशभर संपर्क सुरू असतो. काम करणारे व प्रत्यक्ष फिरणारे लोक फार लेखन करत नाहीत; पण इतक्या कामाच्या व्यापात सुराणा यांनी तब्बल ६९ पुस्तकं लिहिली आहेत. त्यांत दोन पुस्तकं अनुवादित असून, इतर अनेक छोट्या उपयुक्त पुस्तिका आहेत. अर्थशास्त्र सोप्या रीतीनं सांगणारं ‘ग्यानबाचे अर्थकारण’ हे त्यांंचं पुस्तक अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतं, तर ‘ओळख संविधानाची’ या त्यांच्या पुस्तिकेच्या दहा हजार प्रती विकल्या गेल्या आहेत. संपादक-लेखक असलेले सुराणा हे व्यक्तिगत आयुष्यात खूप साधे आहेत. आसू गावातील त्यांच्या घरात बाकावर बसून ते लिहितात व त्याच बाकावर झोपतात.
माणसांना त्यांच्या मर्यादांसह समजून घेण्याची अमर्याद क्षमता सुराणा यांच्यात आहे. समोरच्याचं ते शांतपणे ऐकून घेतात. कुणी कितीही चुकलं तरी चिडणार नाहीत...अशा जिव्हाळ्याच्या वागण्यानं त्यांनी शेकडो कुटुंबं जोडली आहेत.‘आजूबाजूची परिस्थिती चळवळीसाठी इतकी प्रतिकूल असताना तुम्हाला निराशा येत नाही का?’’ या प्रश्नावर ते म्हणतात, ‘‘आंदोलनांचे चढ-उतार येतच असतात. आपलं समाजवादाचं उद्दिष्ट निश्चित असल्यानं त्या उद्दिष्टाकडे प्रवास सुरूच ठेवायचा, त्यामुळे निराशा येण्याचं कारण नाही. चार निवडणुका ते लढले; पण विजय मिळू शकला नाही.‘समाजाचा राग येत नाही का?’ या प्रश्नावर ते हसून म्हणतात, ‘सार्वजनिक जीवनात अहंकार व व्यक्तिगत भावना दूर ठेवायची असते.’चळवळीला ओहोटी का लागली, याबाबत ते सांगतात, ‘जागतिकीकरणानं व्यक्तिवाद वाढतो आहे. समाजाच्या एकूणच वातावरणाचा परिणाम ध्येयवादावर झाला आहे. संघटनेतल्या मतभेदांचा कामावर परिणाम होतो; पण तरुण पिढी पुन्हा हे लढे गतिमान करील.’‘समाजाची नैतिकता’ या विषयावर नव्वदाव्या वर्षीही ते पुस्तक लिहीत आहेत...‘पायपीट समाजवादासाठी’(मनोविकास प्रकाशन) हे त्यांचं आत्मकथन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे.केवळ कॅलेंडरनुसार वय वाढलं म्हणून सुराणा यांना वृद्ध म्हणायचं; अन्यथा वृद्धत्वाची कोणतीच लक्षणं या ‘तरुणा’त नाहीत

हेरंब कुलकर्णी
Heramb Kulkarni


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]