सौदागरची घड्याळ

 सौदागरची घड्याळ

old watch


मूल शहरात म्हणजेच पूर्वीच्या गावात सौदागरची घड्याळ लोकप्रिय होती. या घडाळ्यांने अनेकांना वेळ दिला, वेळेवर काम करण्याची संधी दिली, अनेकांना वेळेत इच्छुकांना पोहचविण्याची संधी दिली.

सुमारे 45 वर्षापूर्वीपासून माझा प्रत्यक्ष या घडाळ्याशी संबध आला. माझेसकट अनेक जण सौदागरच्या तंबाकूच्या दुकानात डोकावून त्या घड्याळात वेळ पाहूनच पुढे निघत असे.

आता घरोघरी घड्याळी आल्यात, वॉल वॉच, टेबल वॉच, डेकोरेटिव्ह वॉच, हातातील घड्याळी, स्मार्ट वॉच आल्यात.  या घड्याळीसोबतच मोबाईल मधील घड्याळही बरीच साथ देत आहे.  मात्र 40—45 वर्षापूर्वी अशा घड्याळी फक्त त्यावेळच्या श्रीमंताच्या घरीच  असायच्या त्यामुळे अनेकांना निश्चित वेळेत कुठे जायचे तर, दुकानातल्या घड्याळीचीच साथ असायची.  त्यात त्यावेळचे सर्वाधिक गर्दीचे, चर्चेचे असलेल्या बाजार चौकात, सोमनाथ रोडवर सौदागरचे तंबाकुचे दुकानात भले मोठे आणि खालच्या दोलकांवर चालणारे घड्याळ होते.  त्यावेळी कदाचित मी पहीलीत होतो, सकाळी 11 वाजता वेळेत शाळेत जायचे तर, शाळेची वेळ झाली कि नाही, हे आम्हाला सौदागरची घड्याळच सांगायची. घरचे लोकही आम्हाला, 'किती वाजले? सौदागरच्या घड्याळीत पाहून ये' असे सांगून त्या घड्याळाच्या सार्वजनिकतेवर शिक्काच मारला होता.  वेळेबाबत दुमत असले कि, सौदागरची घड्याळ हे प्रमाण असायचे.  सौदारगच्या घड्याळातील वेळ पाहूनच, शाळेत जातांना—येतांनची आमची स्पीड ठरत असे.

सौदागरच्या घड्याळीशिवाय, वेळ पाहण्याचे त्याकाळी दुसरेही काही साधने असायची. सकाळी मस्जिद वरून अजान  (अनेक लोक ज्याला 'अल्ला बोंबलला' असेही म्हणायचे) झाले कि, सकाळचे पाच वाजले हे गृहीत धरून, बाया—पुरूष कामाला लागत. विशेषत: ढिवर मोहल्यातील, महिला लाकडी मोळ्या आणायला जंगलात जायला निघायचे तर, त्याकाळी मार्निंग वॉक करणारेही घराबाहेर 'अजान' नंतरच निघायचे.

पोलिस स्टेशनच्या परिसरात राहणार्यांना, पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 10 वाजता जोरात वाजणारी  हजेरीची घंटाही वेळ सांगणारी घड्याळाचे कामे करायची. त्या काळात गोंदिया—चांदाफोर्ट ही डुगडूग चालणारी नॅरोगेज या रेल्वे गाडीच्या हार्नचा आवाज, रेल्वेचा आवाजही सकाळचे 7, दुपारचे 12, दुपारचे 3, आणि रात्रौचे 9 वाजतांची वेळ सांगायची.

त्यावेळचे काही शौकिनांना रेडिओच्या माध्यमातूनही वेळ समजायचे.  बरेचदा रेडिओतून वेळ सांगीतली जायची तर, बिनाका गीतमाला लागले की, रात्रौचे 8 वाजले असे समजायचे.  

या साधनाशिवाय मूल शहरात वेळ सांगणारे दुसरे साधन म्हणजे श्रीराम टॉकीज! "गजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया" ही गणेशाची आरती घुमली की, दुपारचे बारा दुपारचे तीन सायंकाळचे सहा आणि रात्रीचे नऊ वाजले असे समजायचे! ही आरती दिवसातून चार वेळ अचूक सांगायची.

वेळ सांगणारी वेगवेगळी साधने असली तरी सदा सर्वकाळ वेळ मात्र सौदागरची घडीच सांगायची! जवळपास शंभर वर्ष चालणारी या घडीची टिकटिक मागील चार-पाच वर्षांपूर्वी थांबली!

पूर्वी घड्याळी कमी होत्या, मात्र अनेकांकडे वेळ भरपूर होता, आता आपल्याजवळ वेळ कमी आहे, मात्र घड्याळी भरपूर!

५ टिप्पण्या:

  1. घड्याळी कमी होत्या तरी वेळेवर कामे व्हायची आता प्रत्येकाजवळ घड्याळे आहेत म्हणून वेळ मारून न्यायची सवय ही वाढली आहे. छान लेख!

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान माहिती विजय..💐

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]