झाडीबोलीतील साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित व्हावे - संमेलनाध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे
सेंदूरवाफा (प्रतिनिधी)- 

   झाडीबोली साहित्य एक उत्तम असा ठेवा आहे. आपल्या झाडीपट्टीत ही सातत्याने होणारी साहित्य संमेलने इथल्या बोली व संस्कृतीला जिवंत ठेवण्याचे काम करतात. डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी ३० वर्षापूर्वी लावलेल्या या झाडीबोली चळवळीच्या इवल्याशा रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. झाडीबोलीतून निर्माण होणारे साहित्य हे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे असावे.त्यातून जीवनाला आवश्यक असे मार्गदर्शन मिळावे. विशेष म्हणजे विविधतेने नटलेल्या या देशात विविध भाषा बोलल्या जातात. झाडीबोलीतून या देशा एकसंघ ठेवणारे सर्वसमावेशक साहित्य निर्माण व्हावे याकडे लेखकांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सडक अर्जूनीचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी बाम्हणी खडकी येथे केले. झाडीबोली साहित्य मंडळ साकोली व झाडीबोली शाखा बाम्हणी खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आद्य नाटककार भवभूती साहित्य नगरीत आयोजित ३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे उदघाटन करतांना ते बोलत होते.

      यावेळी संमेलनाध्यक्ष डाॅ. चंद्रकांत लेनगूरे, प्रमुख अतिथी केंद्रिय संस्थापक अध्यक्ष डाॅ.हरिश्चंद्र बोरकर,  पूर्व संमेलनाध्यक्ष कवयत्री रंजना हलमारे, पूर्व स्वागताध्यक्ष अमोल हलमारे, पूर्वाध्यक्ष राजन जायस्वाल, एड. लखनसिंह कटरे, डाॅ.हेमकृष्ण कापगते, डाॅ.गुरूप्रसाद पाखमोडे, कवी हिरामन लांजे, कवयत्री अंजना खुणे, संतकवी डोमाजी कापगते,डाॅ. मनोहर नरांजे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, ना.गो.थुटे, नरेश देशमुख,सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार, पवन पाथोडे, कुंजीराम गोंधळे, अरूण झगडकर, विनायक धानोरकर, सौ.  शशिकला गावतुरे, कादंबरीकार विजया ब्राम्हणकर,  स्वागताध्यक्ष विलास वट्टी आदी मान्यवर उपस्थित होते. याचवेळी बोलीमहर्षी डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांंना वेदप्रतिष्ठान नागपूरच्या वतीने साहित्यवेध पुरस्कार डाॅ.मनोहर नरांजे यांच्या तर्फे प्रदान करण्यात आला.

      उदघाटन सोहळ्याअगोदर गावातून पुस्तक पोहा नामक ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात रांगोळी स्पर्धा व वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली. या ग्रंथदिंडीच्या निमित्ताने गावातील लोककलांचे मनमोहक दर्शन झाले. उदघाटनावेळी पूर्वाध्यक्ष रंजना हलमारे  यांनी संमेलनाची सुत्रे चंद्रकांत लेनगुरे यांच्याकडे सोपविली. तत्पूर्वी झाडीबोली चळवळीत योगदान असणार्‍या व एक वर्षात निधन झालेल्या  श्रीराम खुणे, गणपती वडपल्लीवार, आनंदराव मस्के, प्राचार्य मदन धनकर, तुळशीदास लंजे, केशव शेंडे, यशवंत लंजे, भारत कापगते यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.

      यावेळी प्रस्तावनेतून  ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी झाडीबोली चळवळीचा प्रवास वर्णन केला.तत्पूर्वी शाहीर नंदू मसराम व संचाने  झाडीगौरव गीत सादर केले. आदव्याची सुपारी यातून विलास वट्टी यांनी बाम्हणी खडकी येथील इतिहास झाडीबोलीतून मांडला. डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी देखील झाडीबोलीच्या विस्ताराबाबत आशादायी चित्र निर्माण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व तरूणांनी ही जबाबदारी खांद्यावर घेण्याचे आवाहन केले. संमेलनाध्यक्ष डाॅ.चंद्रकांत लेनगुरे यांनी मराठी भाषेवर इतर भाषांचे चाललेले आक्रमण थोपविण्यासाठी आपण सावध असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

     याप्रसंगी 'मातीतून अबारात' या कवितासंग्रहासाठी कवी मुरलीधर खोटेले यांना नाथ घरडे कविता पुरस्कार व डाॅ.घनश्याम डोंगरे संपादन पुरस्कार कुंजीराम गोंधळे यांच्या 'झाडीबोली :स्वरूप व विचार' या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. याचवेळी अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.यात संत डोमा कापगते यांच्या 'सुबोध अमृतवचने', 'हरिश्चंद्र माझा झाडीचा राजा, 'सार्थ पंचरत्न गीता', एड.मनिष कापगते संपादित' जनसंवादी : डाॅ.हेमकृष्ण कापगते', मुरलीधर खोटेले यांचे ' सटवा', पालिकचंद बिसने यांचे ' तारूण्याचे तरंग', छाया बोरकर यांच्या 'माणसाने खाल्ल्या मिठाला जागावे', अडला हरी गाढवाचे पाय धरी', 'हृदयात हिरवाई जपतांना', डाॅ.डी.एम.सुरसाऊत यांचे 'अश्रूधारा', अंजना खुणे यांचे 'अंजनाबाईची कविता', पी.डी.काटकर यांचे 'कळा लागल्या या जीवा,' दौलतभाई पठाण यांचे 'दर्द ए गम', अल्का दुधबुरे यांचे 'शब्दवेध', वामन हाडगे यांचे 'अंभगवाणी व अभंगमाला' या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

        संचालन डॉ .संजयकुमार निंबेकर यांनी तर आभार प्रदर्शन गोंदिया जिल्हाध्यक्ष पवन पाथोडे यांनी केले. यशस्वीतेसाठी विकास खोटेले, विलास शिवनकर, नरेश भेंडारकर, प्रदीप मेश्राम, योगेश्वर गजभिये, किशोर तरोणे, अरूण झगडकर, कुंजीराम गोंधळे, मुरलीधर खोटेले व सर्व आयोजक व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]