प्रत्येक बोलीत एक डॉ. हरिश्चंद्र बोरकर निर्माण होणे गरजेचे - डॉ. गिरीश गांधी
    नागपूर, दि.३१ : आचार्य विनोबा भावे यांच्या प्रमाणेच देशभर हिंडून बोलीची चळवळ संपूर्ण भारतात पोचवण्याचे श्रेय डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जाते. त्यांनी विविध राज्यांमध्ये झाडीपट्टीची लोककला पोचवली. बोलींचे संवर्धन होऊन मराठी भाषा जिवंत राहण्यासाठी प्रत्येक बोलीत एक हरिश्चंद्र बोरकर निर्माण होणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी यांनी केले.
    विदर्भ साहित्य संघ आणि येथील तारा प्रकाशन साकोलीच्या वतीने बोली आणि लोककलांचे ज्येष्ठ संशोधक डॉ. हरिश्चंद्र बोरकर त्यांच्यावरील डॉ. तीर्थराज कापगते संपादित 'बोलीमहर्षी' या ग्रंथाचे प्रकाशन गांधी यांच्या हस्ते करण्यात आले , त्या प्रसंगी ते बोलत होते. विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते. व्यासपीठावर 'मटा'चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, झाडीपट्टीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि लेखक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, संपादक डॉ. तीर्थराज कापगते, कवी मिलिंद रंगारी  यांची उपस्थिती होती.
     हंगामा सारख्या दर्जाहीन गोष्टींमुळे समृद्ध झाडीपट्टी रंगभूमीचे विद्रूपीकरण झाले आहे ते थांबविण्यासाठी डॉ. बोरकरांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करीत  श्रीपाद अपराजित यांनी बोरकर यांच्या कार्याचे महत्त्व उलगडून दाखविले. डॉ. बोरकर यांच्यामुळे झाडीतील लेखकांचा न्युनगंड दूर होऊन ते लिहिते झाले अशा लेखकांची एक संपूर्ण पिढी बोरकरांनी निर्माण केली. त्यांच्या बोली आणि लोककलेच्या क्षेत्रातील उत्तुंग कार्याचा दस्तावेज बोलीमहर्षी या ग्रंथामुळे उपलब्ध झाला आहे, असे ते म्हणाले.
      आपल्या मनोगतात डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोली चळवळीच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. डॉ. बोरकरांच्या देशभर झालेल्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमांचा आढावा बंडोपंत बोढेकर यांनी घेतला, तर मिलिंद रंगारी यांनी अमृतमहोत्सवी सांगता समारंभाचा वृत्तांत सादर केला. अध्यक्षीय भाषणात प्रदीप दाते यांनी बोरकर यांच्या बोलीविषयक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. 
    प्रास्ताविकातून डॉ. तीर्थराज कापगते यांनी बोरकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा धांडोळा घेण्यासाठी हा ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून उपयोगात येईल', असा विश्वास व्यक्त केला. 
    सूत्रसंचालन वृषाली देशपांडे यांनी केले. आभार कल्पना नरांजे यांनी मानले. लोकराम शेंडे यांनी डॉ . हरिश्चंद्र बोरकर यांनी लिहिलेल्या बोलीतील गीताचे गायन केले. या प्रकाशन सोहोळ्याला  ना. गो. थुटे , हिरामण लांजे, विलास मानेकर, एड. लखनसिंह कटरे, सुरेंद्र बुराडे, डॉ .गुरुप्रसाद पाखमोडे, वसंत चन्ने, श्रीकांत धोटे, शरद सहारे यांच्यासह अनेक  साहित्यप्रेमींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]