लेख

एल्गार..

“साध्याच  माणसांचा एल्गार येत आहे,
हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.”
सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’  आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य!   नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा   नाही- तर हा लेख आहे ’श्रमिक एल्गार” वरचा- म्हणजे श्रमिकांची सेना! आता श्रमिकांची नुसती सेना   असेल, पण त्यांच्याकडे   योग्य सेनापती नसेल तर ती सेना काय करू शकेल? पण या ’श्रमिक  एल्गार’ च्या बाबतीत तसे झालेले नाही. त्यांना  अगदी योग्य सेनापती लाभलाय ज्या मुळे प्रत्येक बाबतीत या सेने ने हातात घेतलेले काम पुर्ण केलंय.
प्रत्येक वेळेस  जेंव्हा एखादा ब्लॉग लिहतो,  आणि त्यामधे काही करायची वेळ येते, किंवा एखाद्या गोष्टीबद्दल ब्लॉग वर एखाद्या इश्यु बद्दल लिहले  की बऱ्याचशा कॉमेंट्स अशाही असतात, की असे लेख लिहून काय होणार? काय करू शकतो आपण? सगळ्या सिस्टीम च्या विरुद्ध आपण उभे राहूच शकत नाह, सगळी कडे करप्शन आहे भरलेले. ही लाल फित शाही काही काम करूच देणार नाही कोणाला, हे जे काही आहे, ते असेच चालत रहाणार वगैरे वगैरे  …….
डोंबीवली फास्ट मधल्या नायका सारखी मानसिक घडण होत असते आपली बरेचदा!    त्या डोंबीवली फास्ट च्या नायकाने स्वीकारलेला   मार्ग पण योग्य वाटतो -वाटतं की हत्यार हातात घेऊन रस्त्यात येणाऱ्या सगळ्या अडचणींचा बिमोड करावा! हा मार्ग  जरी अयोग्य असला  तरी सुद्धा बरेचदा आपलं मन त्या मार्गाकडे झुकते हे नक्की. अर्थात आपल्यावरचे संस्कार मात्र त्या गोष्टी तुम्हा-आम्हाला करू देत नाहीत हे नक्की..

रुक्मिणी अवॉर्ड स्विकारतांना.. परोमिता गोस्वामी
पण केवळ योग्य दिशेने प्रयत्न करून गुंता सोडवण्याचे कसब असेल, तर कुठलेही काम कायद्याच्या चौकटीत राहुन पुर्ण केले जाऊ  शकते ह्यावर आपला  लवकर  विश्वासच बसत नाही.  परवाच  वर्षाचा एक् मेल आला होता, आणि  परोमिता गोस्वामी बद्दल समजले, की जिने चंद्रपूर जिल्ह्यात एकांगी लढा लढलाय गेले एक तप!  त्यांच्या बद्दल वाचल्यावर मात्र जर एक गोष्ट लक्षात आली, की जर  एखाद्याची खरंच काही करायची इच्छा असेल तर कुठलीच गो्ष्ट ध्येयपूर्तीकडे जाण्याच्या   आड येऊ शकत नाही .  त्याचीच ही कथा  -मनातल्या   पॉझिटीव्ह विचारांना नक्कीच चालना मिळेल हे वाचल्यावर .


माणिकगढच्या शेतकरी स्त्रिया ज्यांच्यासाठी माणिकगढ सिमेंट विरुद्ध

रणशिंग फुंकले होते त्यांच्या बरोबर
श्रमिक एल्गार !सुरुवातील अगदी साधारण स्वरूपातील सुरु झालेल्या या संघटनेचे सध्या   २० हजाराच्या वर सदस्य  आहेत. श्रमिक एल्गार ट्रेड  युनियन ऍक्ट च्या अंतर्गत   रजिस्टर केलेली चंद्रपुर येथील एक संस्था – कुठलेही राजकीय लागेबांधे नसलेली. इथल्या भागात रहाणाऱ्या आदिवासी आणि गैर आदिवासी  लोकांसाठी ही संस्था काम करते. जंगल विषयक कायदा, दारूबंदी , शिक्षण वगैरे सगळ्याच सामाजिक गोष्टी आहेत की ज्यांच्याबद्दल आंदोलनं केली आहेत एल्गारने.
गडचिरोली जिल्हा!हे नांव प्रत्येकाने ऐकले असेलच.   पोलीस डीपार्टमेट मधे शिक्षा  म्हणून   या जिल्ह्यात पोस्टिंग देतात म्हणून तरी हे नाव  सगळ्यांना माहीती आहे,  नाहीतर   संयुक्त महाराष्ट्रात हा जिल्हा आहे हे कोणाच्याच ध्यानी मनी ही आलं नसतं.( महाराष्ट्रात असूनही नसलेला हा जिल्हा आहे ) नक्षलवादी कारवाया अगदी जोरात सुरु असतात इथे. या जिल्ह्यातल्या  जंगलाला नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हंटलं तरीही चालेल, इतका जोर आहे त्यांचा इथे!
चंद्रपूर पासून जवळ असूनही दूर असलेला हा जिल्हा. नक्षलवादाचा या भागात असलेला प्रभाव, आणि त्यामुळेच या भागात लोकांसाठी ,( आदिवासी किंवा इतर )काही  काम करणे अतिशय कठीण. नक्षलवाद्यांना  हे सामाजिक काम करणारे  लोकं म्हणजे सरकारी  वाटतात, तर सरकारी लोकांच्या मनात कायम संशय असतो की हे लोकं नक्षलवाद्यांशी तर निगडित नाहीत??  इथे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना  नक्षलवाद्यांशी आपले नांव जोडले जाईल का-ही भिती कायम मनात असते.  पण अशा प्रतिकूल परिस्थिती मधे  गेले एक तप काम करणारी एक  व्यक्ती म्हणजे परोमिता गोस्वामी आणि त्यांचे सहकारी!
श्रमिक एल्गार  ने या भागात  काम सुरु   करूनही आता जवळपास दहा एक वर्ष झाली असावीत.  फॉरेस्ट राईट्स ऍक्ट या कायद्या अंतर्गत  त्या भागातल्या आदिवासी लोकांना जमिनीचे पट़्टॆ देण्याचे प्रावधान आहे ,पण शासनाच्या कूर्मगतीने सुरु असलेल्या कामामुळे ,   चंद्रपूर जिल्ह्यातल्या   आदिवासींना मात्र या तरतुदी पासून काहीच फायदा होत नव्हता, तेंव्हा परोमिता गोस्वामी यांच्या    सपोर्ट वर काही आदिवासी/गैर आदिवासी शेतकऱ्यांनी   केलेले आंदोलन, जंगलाच्या  काही भागात केलेली शेती, त्यांना झालेली  अटक .. … वगैरे   घटना इतक्या वेगाने घडल्या की   श्रमिक एल्गार चे नांव सर्वतोमुखी झाले .
१९९९ मधे सरकारी लालफितशाहीने सरळ या संघटनेचा नक्षलवाद्यांशी संबंध आहे म्हणून आरोप केले आणि तपासणीचे शुक्लकाष्ठ मागे लावून दिले.  नक्षलवाद्यांशी काही संबंध नाही हे  सिद्ध करण्यासाठी परोमिताला हायकोर्टात केस करावी लागली .हायकोर्टात बरीच वर्ष  केस चालली, शेवटी २००२ मधे सेंट्रल गव्हर्नमेंट ने परोमिता   आणि  त्यांच्या संघटनेला   क्लिन चिट दिली- की यांचे कुठल्याही नक्षलवादी ग्रूपशी संबंध नाही .
यांच्या संघटनेने बरीच समाजोपयोगी कामं केलेली आहेत. मुख्य म्हणजे दारू बंदी साठी ’मुल ते नागपूर विधानसभेपर्यंत काढलेला  २०००  च्या वर  कष्टकरी बायकांचा  पायी मोर्चा. जवळपास १३० किमी अंतर पायी चालत ३ दिवसात पुर्ण  केले  होते.  दारू मुळे होणारे कुटुंबाचे नुकसान, आणि त्याच्या विरोधात सगळ्या स्त्रियांना एकत्र करून चळवळ उभी करण्याचे मोठे काम त्यांनी केलेले आहे. गवातली दारुची दुकानं बंद व्हावी म्हणून केलेल काम नक्कीच उल्लेखनीय आहे , पण केवळ ए्वढेच नाही तर , गावांमधला पिण्याच्या  पाण्याचा इश्यु,शाळा  अशा अनेक गोष्टींसाठी  त्यांनी आंदोलनं केली- आणि नुसतीच आंदोलनं केली नाहीत , तर शेवटापर्यंत नेली- अगदी रिझल्ट्स मिळे पर्यंत!
त्यांची  एक सगळ्यात मोठी  सक्सेस स्टॊरी म्हणजे माणिकगढची. माणिकगढ सिमेंट म्हणजे  चंद्रपूर मधला एक बिर्ला गृपचा मोठा सिमेंट कारखाना.  सिमेंट कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून लाईम स्टॊन  वापरला जातो. या लाइम स्टोनची खाण कुठेतरी जवळच असेल तर जास्त चांगलं. लाईम स्टोन ला खाणी मधून प्रोसेसिंग प्लांट पर्यंत नेण्यासाठी डम्पर , शॉवेल्स, किंवा कन्व्हेअर चा उपयोग केला जातो. माणीकगढ सिमेंट्ने खाणी पासून कन्व्हेअर बेल्ट लावण्यासाठी सरकारी जमीन वापरायचे ठरवले कारण    कन्व्हेअर चा मेंटेनन्स चा खर्च डम्पर्स, शॉवेल्स किंवा डॊझर्स  पेक्षा फारच कमी असतो , आणि विश्वसनीयता चांगली असते.
माइन्स पासून तर फॅक्टरी पर्यंत असलेली जमीन  फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या  मालकीची, पण या जमिनीवर तिथले आदिवासी आणि इतर गैर आदिवासी लोक वर्षानुवर्ष शेती करत होते. फॉरेस्टची ही जमीन एकाही शेतकऱ्याच्या नावावर नव्हती हे पण लक्षात घ्या. एक दिवस फॉरेस्ट आणि माणिकगढ सिमेंटचे लोकं या लोकांकडे जमिनीचा ताबा मागायला गेले. भरपूर धमक्या देणे, दंडेली करणे वगैरे सगळे प्रकार करून झाले त्या फॅक्टरीचे. बरेच वेळा तर फॅक्टरीचे लोकं  मशिनरी घेऊन पण आले होते काम सुरु करायला पण श्रमिक एल्गार ने या लोकांना भरपूर पाठबळ दिले.
कंपनीचे म्हणणे होते की ती जागा या लोकांच्या नावे नसल्याने तिचे कॉम्पेन्सेशन देण्याचा प्रश्नच येत नाही. कंपनीने मिनिस्ट्री ऑफ एनव्हायरोमेंट ऍंड फॉरेस्ट कडून आवश्यक तो क्लिअरन्स पण आणला होता. तसेच जमिनीची नाममात्र लिझ ची किंमत सरकारकडे जमा केली होती .
इकडे सगळ्या शेतकऱ्यांनी  जो पर्यंत बाजार भावाने कॉम्पेन्सेशन दिले जात नाही , तो पर्यंत जमिनी ताब्यात घेऊ देणार नाही असा पवित्रा सगळ्या शेतकऱ्यांनी घेतला. कशाचा जोरावर सगळे लोकं कॉम्पेन्सेशन मागत होते? जमीन तर नावावर नव्हतीच एकाही शेतकऱ्याच्या?? हा प्रश्न आला असेलच मनात तुमच्या पण. इथेच परोमिता गोस्वामी यांचे एक्स्पर्ट गायडन्स उपयोगी पडले त्या शेतकऱ्यांच्या, की ज्या मुळे कंपनीला झुकावे लागले, आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या.
परोमिता ने काय केलं असेल?   ’फॉरेस्ट  एंटायटलमेंट ऍक्ट’ म्हणून एक कायदा अस्तित्वात आहे, की ज्या कडे कोणाचेच लक्ष नव्हते, या कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या शेतकऱ्यांची बाजू मांडली आणि शेवटी बाजार भावा प्रमाणे या शेतकऱ्यांना ४ लाख रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि घरातल्या एका व्यक्तीला कंपनी मध्ये नोकरी असे निगोशिएट करून  न्याय मिळवून दिला. उभ्या असलेल्या पिकाची जो पर्यंत कापणी होत नाही तो पर्यंत काम सुरु केले जाणार नाही असेही कंपनीने मान्य केले.  अर्थात एखादी व्यक्ती जर कायदा जाणणारी  असेल , तर तिला कायद्याच्या तरतुदींचा व्यवस्थित वापर करून घेता येतो.

माणिकगढ जिंकल्यावर...
काही लोकं कसे  कुठलेही पोलीटीकल बॅकिंग नसतांना सामाजिक कार्य करू शकतात, आणि त्या मधे यशस्वी पण होऊ शकतात  ह्याचं उदाहरण आहेत म्हणजे   परोमिता गोस्वामी. जेंव्हा एखादा सुशिक्षित माणुस मनावर एखादी गोष्ट घेतो, तेंव्हा तो कायद्याच्या चौकटी मधे राहुन सुद्धा एखादे काम कसे करवून घेऊ शकतो याचे हे उदाहरण- ’डोंबीवली फास्ट’ हे   प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही!
नुकताच यशवंतराव चव्हाण विद्यापीठातर्फे परोमिताचा सत्कार करण्यात आला, आणि त्यांना रुक्मिणी पुरस्कार देण्यात आला होता.  हा लेख म्हणजे परोमिता गोस्वामींच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या पॉझिटीव्ह थिंकीग  मुळे  आपले जर कधी विचार भरकटले असतील तर ते  विचार जागेवर यायला मदत होईल. आणि या जगात अजूनही चांगुलपणा शिल्लक आहे , आणि जर ध्येय योग्य असेल आणि स्वतःच्या ध्येयावर विश्वास असेल तर त्याची पूर्ती होणे काही अवघड नाही यावर विश्वास बसेल.
------------------------------------------------
जागे व्हा आंदोलन पेटलय  
आठवीतील स्नेहलला गणिताविषयी काही सोप्या ट्रिक्स सांगताना तिला म्हटले, ‘तू तुझ्या घरचं बजेट काढ.’ त्यावर अगदी निरागसपणे ती सहज म्हणाली की, ‘ताई, माझे बाबा ऑटोरिक्शा चालवत असले तरी त्यांचं उत्पन्न चांगलं आहे. पण अर्धा पैसा तर दारूतच जातो. मग घरचं बजेट कसं काढणार? आई धुणीभांडी करते, पण तरी लहानसहान वस्तू घ्यायलासुद्धा पैसे नसतात. बाबा रोज रात्री येऊन आईसोबत भांडण करतात, आमचा अभ्यासपण होत नाही. अभ्यास करण्याची इच्छाच राहात नाही. त्यापेक्षा असं वाटतं की, आपणही आईसोबत धुणीभांडी करावी म्हणजे निदान लहान भाऊ तरी चांगला शिकू शकेल.’ तिचे हे म्हणणे ऐकले आणि मनात एकदम धस्स झाले. ही परिस्थिती एकट्या स्नेहलचीच आहे का? अशा कितीतरी स्नेहल आज शिक्षण सोडण्याचा नुसता विचार करत नसतील, तर खरेच त्यांचे शिक्षण सुटले असेल. कितीतरी संसार उध्वस्त झाले आहेत. एखाद्या दुर्धर आजाराप्रमाणे दारूने आपल्या समाजाला जखडले आहे. पण त्यावर योग्य औषधोपचार करण्याचे काम आता महिलांनी सुरू केले आहे. त्या पुन्हा एकदा संघटित होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. लाखोंच्या संख्येने महिला पदर खोचून रस्त्यावर उतरल्या असून संपूर्ण दारूबंदीचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि आता यात पूर्ण यश मिळवूनच त्या शांत बसतील, असे चित्र सध्या विदर्भात तरी दिसते आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात पारोमिता गोस्वामी यांनी मोठ्या संघर्षाने पूर्ण दारूबंदी घडवून आणली. विदर्भातील एका जिल्ह्यात जर हे घडू शकते तर आपल्या जिल्ह्यात का होऊ नये, असा विचार सामाजिक चळवळीतील तरुण महिलांना पडला आणि त्यांनी पुन्हा नव्याने कंबर कसून कामाला सुरुवात केली. मागील दोन वर्षांत यवतमाळ आणि बुलडाणा जिल्ह्यात दारूबंदीच्या चळवळीने जोर धरला असून महिलाच नाही तर युवकदेखील यात सहभागी झाले आहेत. नुसते. मोर्चे, आंदोलन करून सरकारचे कान उघडणार नाहीत, तर त्याचे डोळेदेखील उघडले पाहिजेत, म्हणून नानाविध मार्गांनी, नवीन शक्कल वापरून आंदोलन करण्यात आले. शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत दारूबंदी प्रचार कार्यालय पूर्वी काम करायचे. या अंतर्गत कलापथकाच्या माध्यमातून प्रचार, प्रसार केला जायचा. याच कलापथकातून यवतमाळ जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता महेश पवार यांना नुसते पथनाट्य केले तर दारूबंदी शक्य आहे का, असा प्रश्न पडला आणि स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियान सुरू झाले. पथनाट्याच्या माध्यमातून अनेक गावांत फिरत असतानाच घाटंजी तालुक्यातील वघारा टाकळी गावातील बचत गटातील काही महिलांनी गावात पूर्ण दारूबंदी व्हावी, असा विचार व्यक्त केला आणि त्यांच्या एकत्र प्रयत्नाने गावात दारूबंदी झाली. पण काही महिन्यांनंतर त्या महिलांनी सांगितले की, आमच्या गावात तर दारू मिळत नाही, परंतु गावातील पुरुष शेजारच्या गावात जाऊन दारू पितात. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी संपूर्ण जिल्हा दारूमुक्त होण्यासाठी मोठी चळवळ सुरू केली. यातील पहिले आंदोलन घाटंजीला झाले. त्या वेळी स्थानिक आमदारांना जवळपास ४ हजार महिलांनी घेराव घालून आपल्या व्यथा मांडल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत जवळपास ५०७ देशी दारूची दुकाने, बिअरबार आहेत. त्यापैकी १०९ दुकाने ही वणी तालुक्यात आहेत. वणी तालुक्यातील पौर्णिमा शिरभाते आणि ज्योत्स्ना आचार्य या दोघींनी पुढाकार घेऊन आंदोलन करण्याचे नियोजन केले. त्यानुसार ५ मे रोजी मोर्चा काढायचा, असे जाहीर करण्यात आले. मात्र, काही समाजकंटकांनी संस्थेच्या नावाने पत्रक काढले की, आंदोलन पुढे ढकलण्यात आले असून ८ मे रोजी करण्यात येईल. त्यामुळे अनेक महिला आल्या नाहीत. तरीही उपस्थित हजार महिला वणीतील मुख्य चैकात दुपारी दोन वाजता रस्त्यावर झोपून राहिल्या. त्यानंतर उमरखेड तालुक्यातील दोन हजार महिलांनी दोरखंडाने हाताला बांधून आम्हाला दारूच्या त्रासातून मुक्त करा, अशी मागणी केली. नेर तालुक्यातील महिलांनी नवी शक्कल लढवली. त्यांनी फाटक्या साड्यांवर आपल्या व्यथा लिहिल्या. या फाटक्या साडीप्रमाणे अजून किती संसार फाडणार आहात, असा थेट सवाल त्यांनी केला. रक्षाबंधनाला त्यांनी या साड्या मुख्यमंत्र्यांना कुरिअर केल्या. यात त्यांनी एक पत्र आणि राखी पाठवली. ‘मुख्यमंत्री भाऊराया, माझा संसार दारूमुळे या साडीसारखा पूर्ण फाटला आहे. या रक्षाबंधनाला ओवाळणी देताना नवी कोरी दारूबंदीची साडी मला दे.’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महागाव येथे या महिलांना तरुणांनी साथ दिली. यवतमाळ येथे ‘दारू चले जाओ!’आंदोलन करून तरुणांनी नवा इतिहास घडवला. जिल्ह्यातील जवळपास १५ हजार युवक-युवती एकत्र आले. महेश पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या मोर्चाचेे महिलांना युवकांचा भक्कम आधार मिळाला. सध्या यवतमाळ जिल्ह्यात ४० ते ४५ हजार महिला आणि १५ हजार युवक-युवती संघर्ष करत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात पूर्ण दारूबंदीच्या मागणीने जोर धरला असतानाच बुलडाणा जिल्ह्यात पूर्ण दारूबंदी व्हावी, यासाठी प्रेमलता सोनोने यांचा लढा सुरू आहे. वीस वर्षांपासून अस्तित्व महिला बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून ताई काम करत आहेत. सोनाळा येथे राहात असलेल्या प्रेमलताताईंचे मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी हे माहेर. तेथे शाळेजवळच दारूचे दुकान असल्याने सातवी-आठवीतील मुलं दारू पिऊन शाळेत येत, शाळा सुटल्यावर सरळ दारूच्या दुकानावर जात. जवळच्या मैत्रिणीचा संसार दारूने कसा उदघ््ध्वस्त झाला, हेदेखील त्यांनी अनुभवले होते. त्यामुळे गावात दारूबंदी करण्याचा निर्धार त्यांनी केला आणि महिलांना घेऊन आंदोलन केले. आंदोलन करणार, ही नुसती बातमी पसरली तसा त्यांच्यावर सासरच्या मंडळींकडून दबाव यायला सुरुवात झाली. सासरी राजकीय वातावरण, त्यात दिराचे दारूचे दुकान असल्याने प्रेमलताताईंना वाळीत टाकण्यात आले. पण त्यांचे पती डॉ. प्रकाश यांनी पत्नीच्या कार्याला पूर्ण पाठिंबा दिला. ताईंनी गावातील महिलांना एकत्र करून ‘मदिरा प्राशन निषेध आंदोलन’ केले. आंदोलनाचा प्रभाव पडला आणि जिल्हाधिकार्यांनी आदेश काढले. जवळपास एक महिना त्यांनी पतीसोबत गावातील प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन दारूबंदीविषयी जनजागृती केली. यात एक-एक गावात दारूबंदी करणे फार त्रासदायक ठरू लागले. आणि मग सुरू झाला संपूर्ण जिल्हा दारूबंदीच्या संघर्षाचा प्रवास. १२ डिसेंबर २०१४पासून त्यांनी संपूर्ण जिल्हा दारूबंदीसाठी कार्य सुरू केले. संग्रामपूर तहसिलवर हजार महिलांनी मोर्चा काढला. याशिवाय स्वाक्षरी अभियान, रास्ता रोको अशा सर्व प्रकारे आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महिलांनी केला.
नुसते आंदोलन करून आपले सरकार जागे होणार नाही, त्यांना आता हलवण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यावर नवी कल्पना ताईंनी शोधून काढली. जागतिक महिला दिनी दारूच्या बाटलीची मोठी प्रतिकृती तयार करून ताईंनी त्यात स्वतरूला गाडून घेतले. दारूमुळे संसारच नाही तर जीवन नष्ट होत आहे, असा संदेश त्यांनी या ‘बिना छत्र बाटली बैठो आंदोलन’ यातून दिला. या वेळी ५०० महिलांनी साथ दिली. २ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ‘जिजाऊ आत्मक्लेश आंदोलन’ करण्यात आले. बुलडाणा मातृतीर्थ जिल्हा असतानादेखील तेथील प्रशासन दारूबंदीसाठी काहीच का पावले उचलत नाही, आजच्या जिजाऊंचा आवाज त्यांना ऐकू येत नाही का, असा जागर करण्यात आला. हा संघर्ष पूर्ण दारूबंदी झाल्याखेरीज थांबणार नाही, या महिलांना बळ मिळो व यश लाभो.
- हिरल गावंडे अकोला
--------------------------------------------------------------------------------------------------


योजना सामाजिक न्यायाच्याबुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत समाजामध्ये सामाजिक न्याय निर्माण करण्याचे कार्य केल्या जाते. समाजातील वंचित घटकासाठी हा विभाग कार्य करतो. समाज कल्याण विभागामार्फत समाजाच्या कल्याणाच्या विविध योजना राबविल्या जातात. गेल्या वर्षभरात या विभागाने विविध कल्याणकारी योजना राबवून समाजातील वंचित घटकाला सामाजिक न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, शासकीय वसतिगृह, निवाशी शाळा, नागरी हक्क संरक्षण, अनुसूचित जाती उपयोजना, रमाई घरकुल योजना, मिनिट्रेक्टर योजना, मोटर वाहन चालक प्रशिक्षण योजना व पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षण अशा विविध योजनांचा यात समावेश आहे.

अनुसूचित जाती घटकातील ज्या कुटुंबाला घर नाही अशा कुटुंबाला घर देण्यासाठी रमाई घरकुल योजना आहे. या योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात खुप चांगले काम झाले आहे. रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद क्षेत्रात एकूण 712, महानगरपालिका क्षेत्रात एकूण 840, ग्रामीण विभागात 11585 असे एकूण 13147 लाभार्थ्यांची निवड केलेली असून त्यांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.

शिक्षणाचे महत्व लक्षात घेता शैक्षणिक योजना राबवून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 401 महाविद्यालय, विद्यालयातील 54900 विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले आहे. इतर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे काम सुरु आहे. परदेशातील शिक्षणाकरीता तसेच देशाअंतर्गत उच्च शिक्षणाकरीता सामाजिक न्याय विभागतर्फे होतकरु युवक युवतींना शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेचा लाभ असंख्य लाभार्थी घेत आहेत.

मुला मुलींची शिक्षणाची सोय व्हावी यासाठी वस्तीगृहाची व्यवस्थाही या विभागामार्फत केली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात मुलांची 5 तर मुलींची 3 वस्तीगृहे असून या सोईचा 414 मुले मुली लाभ घेत आहेत. सन 2014-15 सर्व वसतिगृहात ऑनलाइन प्रवेश प्रक्रियाद्वारे प्रवेश निवड करण्यात आले. भिवकुंड येथे मुलांची तर चिमूर येथे मुलींची निवासी असून या ठिकाणी 181 मुले व 182 मुली शिक्षण घेत आहेत.

मोटर वाहन प्रशिक्षण योजनेत सन 2012 -13 मध्ये अनुसूचित जाती 984, इमाव 1127, विजाभज 249 व विमाप्र 56 विद्यार्थ्यंना लाभ देण्यात आला. सन 2013 -14 मध्ये अनुसूचित जाती 450, इमाव 601, विजाभज 113 व विमाप्र 24 विद्यार्थ्यंना लाभ देण्यात आला. सन 2014 -15 मध्ये अनुसूचित जाती 781, इमाव 1364, विजाभज 226 व विमाप्र 3 विद्यार्थ्यंना लाभ देण्यात आला. या विभाग मार्फत युवक युवतींना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी जाहिरात देऊन निवड करण्यात येते. निवड झालेल्या युवक युवतींना हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे प्रशिक्षित केले जाते. अशा प्रकारे सामाजिक समता निर्माण करण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे.

- रवी गिते
जिल्हा माहिती अधिकारी

-------------------------------------------------------------------


चंद्रपूर शहर वाटचाल

स्वातंत्र मिळेपर्यंत हे शहर परकोटाच्या बाहेर गेले नव्हते. हद्द ओलांडली की, जंगल लागायचे. जटपुरा गेटच्या बाहेर ब्रिटिशांनी त्यांच्या कचेऱ्या सर्वात आधी उभारल्या. आता जेथे जिल्हा परिषदेची इमारत आहे तेथे डिस्ट्रिक्ट कौन्सिल होती. आज ही इमारत कृषी खात्याच्या वापरात आहे. आता जेथे प्रशासकीय इमारत आहे तेथे उसाचा मोठा घाणा होता. लोक रात्री या भागात जायला घाबरायचे. मग हळूहळू इकडे वस्ती होत गेली. आताचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे घर; नागपूर मार्गावरचे, याच काळातले. राज्याच्या एका टोकावर वसलेल्या चंद्रपूर शहराला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा आहे.

आता विविध उद्योगांनी गजबजलेले हे शहर आधी वेगळेच होते. गोंडकालीन राजवटीत ५३५ वर्षांपूर्वी राजे बल्लारशाहने या शहराची निर्मिती केली. या राजाने नजीकच्या बल्लारपुरातून त्याची राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला आणि या शहराची स्थापना झाली. भला मोठा परकोट आणि त्याला पठाणपुरा, जटपुरा, बिनबा आणि अंचलेश्वर, हे चार मोठे दरवाजे, असे या शहराचे प्रारंभीचे स्वरूप होते. राजा आला, मग त्याच्यासोबत प्रजाही आली आणि हळूहळू हे शहर स्थिरावत गेले. त्या काळात आजसारखी राज्ये नव्हती, त्यांच्या सीमा नव्हत्या पण, ठराविक अंतरावर बदलत जाणारी भाषा होती. त्यामुळे या शहराची ओळख आणि प्रतिमा आरंभापासून मिश्र संस्कृतीची राहिली. राजाला गरज पडत गेली तेव्हा दक्षिणेतून वेगळी संस्कृती व भाषा जोपासणारे लोक येथे येत गेले आणि या शहराच्या लोकजीवनात नवनव्या गोष्टींची भर पडत गेली. गोंडराजे ब्रिटिशांनाच काय पण, मोगलांनाही कधी शरण गेले नाही. त्यामुळे या शहरावर कधीही मोगलांचा अंमल राहिला नाही. ब्रिटिशांनी मात्र लढाई करून ताबा मिळवला. अशीच एक मोठी लढाई परकोटाच्या अगदी बाहेर झाली. आज तेथे रामबाग नर्सरी व वनखात्याची कार्यालये आहेत. लढाईच्या पाऊलखुणा तेवढय़ा नाहीत. सतराव्या आणि अठराव्या शतकात या शहराला मोठी संत परंपरा लाभली. निकालस महाराज, संत हयग्रीव, भोबडतुल्लाशाह, इनाशी मिया पापामिया, गोविंदस्वामी, संत दासोबा, गुलाबराव महाराजांचे शिष्य बाबाजी महाराज पंडित, अशी अनेक नावे आहेत. सर्वधर्माचा व सर्व विचारांचा आदर करणारे हे संत होते. त्यांची मंदिरे, समाधी स्थळे व दर्गे आजही आहेत पण, आधुनिकेतचा ध्यास धरणाऱ्या या शहराचे त्याकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. आजही ही मंदिरे संत-वाणीची महती सांगतात पण, थोडा अपवाद वगळता कुणीही तिकडे फिरकत नाही. या मंदिरांचा जीर्णोध्दार व्हावा, असेही कुणाला वाटत नाही. प्रारंभीची बरीच वष्रे या शहराचे स्वरूप परकोटापुरतेच मर्यादित होते. शहराच्या दोन्ही बाजूला वाहणाऱ्या इरई व झरपट या दोन नद्या आणि त्याच्या काठाने विकसित झालेल्या वाडय़ा यातून या शहरातील वस्तीने आकार घेतला. यातूनच मग जातीनिहाय मोहल्ले निर्माण झाले. परकोटाच्या टोकावर माळी मोहोल्ला, एका बाजूला तेली, शहराच्या मध्ये मालगुजार ब्राम्हण आणि मग आजूबाजूला विखुरलेला इतर समाज, असे या शहराचे स्वरूप होते. काळाच्या ओघात आता बरेच बदल झाले असले तरी परकोटाच्या आतील मोहल्ल्यांची रचना फारशी बदलली नाही. अगदी एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत माळय़ांनी भाजीपाला पिकवायचा आणि तेली समाजाने तेलाचे घाणे चालवायचे तसेच, व्यापारपेठेची सूत्रे सांभाळायची, अशीच रचना होती. त्यामुळे तेव्हाच्या चांद्याचा भाजीपाला आणि तेलघाण्या संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध होत्या. आता सर्व बदलले आहे. एखाद दुसरा अपवाद वगळता या वाडय़ा नामशेष झाल्या आहेत. तेलाचे घाणे तर कधीचेच काळाच्या उदरात गडप झाले आहेत. जमिनीला भाव आल्याने वाडय़ा विकून व शहराभोवतीच्या शेतीला किंमत आल्याने हे समाज इतर व्यवसायात स्थिरावले. आता भाजीबाजारावर स्थलांतरितांचे नियंत्रण आहे तर, बाजारपेठ पूर्णपणे हिंदी भाषिकांच्या ताब्यात गेली आहे. १९ मे १८६७ ला येथे नगर पालिकेची स्थापना झाली. त्यानंतर या शहराच्या विकासाने हळूहळू आकार घेतला. आता जेथे शहर पोलीस ठाणे आहे तेथे आधी कोतवाली होती. त्यातूनच पालिकेचा कारभार सुरू झाला. याच दशकात पालिकेची इमारत व टाऊन हॉल झाला. आता पालिकेची भव्य इमारत नाहिशी झाली आहे. त्या ठिकाणी नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे तर, पुढे नेताजीनगर भवन, असे नामकरण झालेला टाऊन हॉल दहा वर्षांपूर्वीच पाडण्यात आला. त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या सातमजली इमारतीत नेताजी सभागृह आहे पण, त्याचा वापर आता सार्वजनिक मुतारी म्हणून केला जातो! राजकीय नेत्यांच्या जाहीर सभांची हौस भागवणारा गांधी चौक शतकानुशतके या शहराचा केंद्रबिंदू राहिला. देशाला स्वातंत्र मिळाले तेव्हा या चौकाला महात्म्याचे नाव देण्यात आले. त्याआधी शहरात गोल बाजारात एक मैदान होते. स्वातंत्र्य लढय़ात लोकमान्य टिळकांची जंगी सभा येथे झाली तेव्हापासून त्याला टिळक मैदान, असे नाव पडले. आज हे मैदान लुप्त झाले आहे. तेथे भाजीबाजार बांधण्यात आला पण, आता तेथे गुरांचे साम्राज्य असते! तेथून भाजी व धान्याचा बाजार गंजवार्डात आला. आता तो तेथूनही हटला तरी या जागेची अवस्था जशीच्या तशी आहे. अगदी स्वातंत्र मिळेपर्यंत हे शहर परकोटाच्या बाहेर गेले नव्हते.

हद्द ओलांडली की, जंगल लागायचे. जटपुरा गेटच्या बाहेर ब्रिटिशांनी त्यांच्या कचेऱ्या सर्वात आधी उभारल्या. आता जेथे जिल्हा परिषदेची इमारत आहे तेथे डिस्ट्रिक्ट कौन्सिल होती. आजही ही इमारत कृषी खात्याच्या वापरात आहे. आता जेथे प्रशासकीय इमारत आहे तेथे उसाचा मोठा घाणा होता. लोक रात्री या भागात जायला घाबरायचे. मग हळूहळू इकडे वस्ती होत गेली. आताचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे; घर नागपूर मार्गावरचे याच काळातले. १९५८ ला या भागात जनता कॉलेज दिवं. श्रीहरी जीवतोडे यांनी सुरू केले आणि उच्च शिक्षणाची संधी मिळायला सुरुवात झाली. लोकांचा वावर वाढला आणि तेव्हापासूनच परकोटाच्या बाहेरची वस्ती वसायला सुरुवात झाली. आता सुमारे एक लाख लोकवस्तीचा तुकूम परिसर तेव्हा देवई गोविंदपूर हे तलावाकाठी वसलेले लहानसे गाव होते. स्वातंत्र्य लढय़ात मा. सा. कन्नमवारांचे नेतृत्व या शहरात उदयास आले आणि मग विकासाच्या वाटचालीवर अनेक स्थित्यंतरे वेगाने घडू लागली. त्यांनी उड्डाणपूल तयार करून घेतला. त्यामुळे तुकूमचा भाग शहराला जोडला गेला. त्यांच्याच प्रयत्नाने विविध उद्योग या भागात येऊ लागले आणि मग शहराचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात झाली. शहरातले महाकाली मंदिर हे अनादी काळापासून शहराचे श्रध्दास्थान. तेथे भरणाऱ्या यात्रेला योग्य स्वरूप देण्यात कन्नमवारांचा मोठा वाटा होता.

एकेकाळी खून, मारामाऱ्या व तमाशातील दौलतजादीने गाजलेली ही यात्रा आता पूर्णपणे कोमेजून गेली आहे. दरवर्षी लाखो भाविक येतात आणि दर्शन आटोपून परत जातात. १९५४ पर्यंत या शहराचे नाव चांदाच होते. ब्रिटिशांनी उच्चारासाठी सोयीचे जावे म्हणून चांदा शब्द निवडला. कन्नमवारांनी पाठपुरावा करून ‘चांदा’चे चंद्रपूर करून घेतले. १९७५ ला येथे औष्णिक वीज केंद्राची मुहूर्तमेढ रोवली गेली. तेव्हा तुकूमच्या पुढे घनदाट जंगल होते. नऊ वर्षांत या केंद्राची उभारणी झाली आणि या भागाचा पूर्णपणे कायापालट झाला. शतकभरापूर्वी हे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जायचे. दोन नद्या व त्यात मध्ये तलाव, असे तेव्हाचे स्वरूप होते. घुटकाळा, तुकूम, लाल तलाव, लेंडाळा, कोनेरी व रामाळा अशी तलावांची मोठी यादीच होती. आता काळाच्या ओघात रामाळा वगळता सारे तलाव बेपत्ता झाले आहेत. घुटकाळा, तुकूम तलावाच्या भागात दाट लोकवस्ती आहे. तेथे तलाव होता, हे आज कुणाला सांगितले तर आश्चर्य वाटेल. काही दशकापूर्वी घुटकाळा भागात पालिकेने विकासकामे हाती घेतली तेव्हा या तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या भूमीपूजनाचा दगड एका घरी धुण्याचा गोटा म्हणून सापडला. दीडशे एकरात असलेला रामाळा तलाव तेवढा वाचला आहे पण, त्याच्यावरही चारही बाजूने अतिक्रमणाचा मारा होतच आहे. लेंडाळा व लाल तलाव कुठे होते, हे अनेक जुन्याजाणत्यांनाही ठावूक नाही. कारण, त्यावर उभ्या राहिलेल्या वस्त्यांची नावे बदलली आहेत. आता हे शहर औद्योगिकनगरी म्हणून ओळखले जात असले तरी उद्योग व या शहराचा संबंध अतिशय जुना आहे. एकेकाळी हे शहर काच, लाकूड व कोळशाच्या उद्योगांसाठी प्रसिध्द होते. पटेल कुटुंबाचा एस.जी.ग्लास वर्क्स हा अतिशय जुना कारखाना. आता महाकाली मंदिराच्या समोरच्या भागात त्याचे भग्न अवशेष तेवढे उरले आहेत. लाकडाचा व्यापार आता शासनाच्या हातात तर, कोळसा उद्योग केंद्राच्या मालकीचा झाला आहे. उद्योगांची परंपरा अतिशय जुनी असल्याने स्थलांतरितांचा मोठा ओघ या शहराकडे कायम वळत राहिला. देशाच्या कानाकोपऱ्यातून या शहरात शेकडो लोक रोजगार व व्यापाराच्या निमित्ताने आधीपासून येत राहिले. यातील बहुसंख्य येथेच स्थायिक झाले आणि मिश्र लोकवस्तीचे हे शहर दिवसेंदिवस जास्त अठरा पगड जाती समूहांचे होत गेले. या शहराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, रोजगार व व्यापारासाठी आलेल्या समूहांना या शहराने कायम आपलेसे केले. एवढेच नाही तर, त्यांना राजाश्रय सुध्दा दिला. परका, बाहेरचा असा वाद येथे कधी निर्माण झाला नाही. म्हणूनच आज या शहराच्या बहुतांश आर्थिक नाडय़ा याच स्थलांतरितांच्या हाती सामावलेल्या आहेत. कोळसा व्यापार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. अगदी कफल्लक झालेला पण, डोके असलेला माणूस या शहरात आला तरी काही वर्षांत कोटय़धीश बनतो. अशी असंख्य उदाहरणे आहेत. मिश्र संस्कृतीमुळेच या शहराला कधीही दंगलीचे गालबोट लागले नाही. दक्षिण आणि उत्तर भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ बघायचा असेल तर या शहराएवढे दुसरे चांगले ठिकाण नाही. यामुळेच येथील भाषेला एक वेगळय़ा प्रकारचा बहुश्रृतपणा लाभलेला आहे. या शहरात विसाव्या शतकात अतिशय लोकप्रिय असलेली ‘गादी’ नावाचा प्रकार आता संपुष्टात आला आहे. गादी म्हणजे चार मान्यवरांनी एकत्र गप्पा करण्याचे ठिकाण. जुन्या जाणत्यांच्या आठवाप्रमाणे आधी नुराभाईची गादी अतिशय प्रतिष्ठेची होती. तेथे बसायला मिळणे मानाचे समजले जायचे. आता त्या ठिकाणी यंग इंडिया बुक स्टॉल आहे. नंतर छगनलाल खजांची व भास्करवारांची गादी काही दशके लोकप्रिय होती. साऱ्या शहराचे राजकारण या गाद्यांवरून चालायचे. यातून मोठे झालेले विलास मुत्तमेवार आजही राजकारणात सक्रिय आहेत.

आता आधुनिकतेच्या काळात या गप्पा बंद पडल्या आहेत. मोगरे व हजारेंची मिठाईची दुकाने आणि सेवासदन व मिलन हॉटेल हे एकेकाळी शहरातील प्रसिध्द ठिकाणे होती. मिलन हॉटेलने तर कॉलेजकुमारांची एक पिढीच घडवली. आता ही सारी प्रतिष्ठाने बंद पडली आहेत. असाच जुना महिमा सांगणारे गणपत बालाजी साळवे हे स्टीलचे दुकान अजूनही सुरू आहे. याच दुकानाच्या बाजुला हमालांचा गणपती बसायचा. काळाच्या ओघात हमाल बदलत गेले तरी त्यांचा गणपती कायम आहे. हे शहर फार उत्सवप्रिय कधीही नव्हते. मात्र, एकेकाळी पतंग उडवण्याचा शौक शहरात सामूहिकपणे साजरा व्हायचा. आता राजकारणात सक्रिय असलेले पोटदुखे व पुगलिया यांचे पतंग उडवणे अगदी शाही असायचे. नंतर ही पतंगबाजी थांबली व राजकारणातील सुरू झाली. शोभाताई फडणवीस, हंसराज अहीर, सुधीर मुनगंटीवार ही त्यापुढच्या पिढीतील अग्रेसर नावे. बदलत्या काळासोबत हे शहर सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात दिवसेंदिवस समृध्द व प्रगल्भ होत गेले. शास्त्रीय गायन, साहित्य संमेलने, विविध कार्यक्रम यांची रेलचेल सतत वाढत गेली. याला प्रामुख्याने हातभार लावला तो शांताराम पोटदुखे, मदन धनकर, श्रीहरी जीवतोडे व बोझावारांनी. सुरेश व्दादशीवारांनी तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचे नेतृत्व काही काळ सांभाळले. या सर्वाच्या मार्गदर्शनाखाली अनेक नव्या सांस्कृतिक संघटना या शहरात स्थिरावल्या. पोटदुखे यांनी शिक्षण क्षेत्रात विणलेले जाळे हा विसाव्या शतकातील लक्षणीय बदल म्हणावा लागेल. यामुळे हे शहर शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाऊ लागले.

काळाच्या ओघात जुन्या काळी नावाजलेल्या काही शाळांची पार रया गेली. शैक्षणिक बदल न स्वीकारणे व संस्थागत भांडणे यामुळे या शाळांची अशी दशा झाली. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्राची बेमालूम सांगड घालत शहराला एक वेगळी श्रीमंती मिळवून दिली. याच शतकात व्यंगचित्रकार व काष्ठशिल्पी मनोहर सप्रे यांचे नाव देशपातळीवर पोहोचले. वाढत्या उद्योगांमुळे या शहराला पडलेला प्रदूषणाचा विळखा, हेही एक मोठे स्थित्यंतर म्हणावे लागेल. शहरात एवढे बदल घडूनही परकोटाच्या आतील भाग व बाबूपेठचा परिसर अजूनही जुन्या वैभवांची साक्ष पटवणारा आहे. दोनशे वर्षांच्या इमारती आजही या शहरात दिसतात. बाबूपेठ या शहराचा भाग बनले पण, अजूनही तेथील घरांची रचना जुनीच आहे. फार पूर्वी बाबूपेठमधून या शहरात येऊन राहण्याची एक फॅशन होती. आजही ती कायम आहे. आजूबाजूच्या परिसरात औद्योगिकदृष्टय़ा प्रगत होऊन सुध्दा हे शहर मात्र त्या अर्थाने विकसित झाले नाही. आजही या शहराचा कारभार केवळ गांधी व कस्तुरबा या दोनच रस्त्यावर चालतो. परकोटाच्या बाहेर शहर वाढले पण, तिकडे सर्व सोयी निर्माण करण्यात राज्यकर्ते अपयशी ठरले. त्यामुळे काही भाग वगळता वाढलेली वस्ती बकाल राहिली. आज या शहरातील चाळीस टक्के लोक झोपडपट्टय़ांमध्येच राहतात. यातील काही भागात साधा फेरफटका मारला तरी वेगळय़ात शहरात फिरत असल्याचा भास अनेकदा होतो. इतकी भिन्न संस्कृती या भागात जोपासली गेली आहे. एकीकडे आत्यंतिक श्रीमंती व दुसरीकडे टोकाची गरिबी, असे सरळ सरळ दोन भागात या शहराचे विभाजन झालेले आहे. काही दशकापूर्वी या शहरात सामूहिक जबाबदारीचे भान बाळगणारे अनेक जण होते. आता अशा जबाबदारीचा देखावा उभा करणारे जास्त झाले आहेत. त्यामुळे या शहराच्या विकासाचा एकजिनसी विचार मागे पडत चालला आहे. मिश्र संस्कृतीतून येणारी परकेपणाची भावना कदाचित याला कारणीभूत असेल. मूळात या संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र आलेला समाजातील मोठा वर्ग राजकीय व सामाजिक जबाबदार बांधीलकीपासून स्वत:ला दूर ठेवत आला आहे. गेल्या तीन दशकात ही बाब ठळकपणे दिसून आली. त्यातून निर्माण झालेली पोकळीच या शहराचे स्वरूप बकाल करत गेली आहे, हे सत्य कटू आहे पण, हेच वास्तव आहे

देवेंद्र गांवडे

( साभार चंद्रपूर श्‍ाहरावर बोलके भाष्य करणारा लेख)

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]