आदर्श शि.प्र.मंडळाच्या कर्मचारी मेघा पानसरे यांचेवर कारवाई करा

आदर्श शि.प्र.मंडळाच्या कर्मचारी मेघा पानसरे यांचेवर कारवाई करा
माहिती अधिकार कार्यकर्ते बबन रणदिवे यांची मागणी 
राजुरा, तालुका प्रतिनिधी -
                     श्री.शिवाजी महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणुन कार्यरत मेघा पानसरे - नलगे यांनी सेवेत असतांना परवानगी न घेता त्याच काळात राजुरा, गडचांंदूर, बल्लारपूर येथून उच्चशिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी तब्बल सात वर्षे घड्याळी तासिका तत्त्वावर कार्य करून त्याचा लाभही घेतला. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बबन रणदिवे यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार केली. दोषी आढळून आल्यावरही कर्मचाऱ्यावर वसुली अथवा कार्यवाही अद्याप झाली नाही. आता या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते बबन रणदिवे यांनी पत्रपरिषदेत केली.
                   आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित शिवाजी महाविद्यालय, राजुरा येथे दिनांक १ एप्रिल १९९५ रोजी मेघा गोविंद पानसरे प्रयोगशाळा परिचर पदी रूजू झाल्या. यानंतर कर्मचारी म्हणुन कार्यरत असतांना पानसरे यांनी शिवाजी महाविद्यालयातून पदवी, गडचांदूर येथून बी.एड. आणि बल्लारपुर येथून गृहअर्थशास्त्र यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. वास्तविक प्रत्यक्ष सेवेत असतांना त्याच वेळी पंधरा आणि पंचवीस किलोमीटर अंतरावरील महाविद्यालयात नियमित शिक्षण कसे काय घेतले, असा प्रश्न रणदिवे यांनी उपस्थित केला आहे.
                  या कर्मचाऱ्याने कर्मचारी म्हणुन कार्यरत असतांनाच सन 2010 -11 ते 2016 -17 या शैक्षणिक सत्रात घड्याळी तासिका तत्त्वावर कार्य करून त्याचा लाभही घेतला, असा आरोप आहे. दिनांक ७ डिसेंबर २०१७ रोजी मेघा पानसरे यांनी प्रयोगशाळा परिचर पदाचा राजीनामा देऊन कार्यमुक्त झाल्यावर त्याच दिवशी शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणुन रुजू झाल्या. त्यानंतर दिनांक १ मार्च २०१८ ला त्यांना संस्थेने जुन्याच पदावर रुजू करून घेतले. 
                   आपल्या राजकिय संबंधाचा फायदा घेत संस्थेच्या सहमतीने मेघा पानसरे यांचे नियमबाह्य कार्य असून हे शैक्षणिक नियमांच्या विरुद्ध आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ यांनी शासकीय नियमांचे उल्लंघन केले आहे. या सर्व प्रकरणांची व शैक्षणिक संस्थेतील गैरव्यवहाराची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते बबन रणदिवे यांनी महामहिम राज्यपाल, उच्च शिक्षण संचालक व सह संचालक, शिक्षण विभागाचे मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त व नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू यांचेकडे केली. शिक्षण विभागाच्या आदेशानुसार आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिवक्ता ॲड. अभय पाचपोर यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमली. या समितीने सविस्तर चौकशी केली आणि सबंधित कर्मचारी यांना आपले म्हणणे मांडण्याचा सर्व संधी दिल्यानंतर या चौकशी अधिकार्‍यांनी मेघा पानसरे- नलगे यांना दोषी ठरविले असून त्यांना संस्थेने सेवामुक्त करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान ही चौकशी थांंबवावी म्हणुन पानसरे चंद्रपुर न्यायालयात गेल्या, मात्र दिलासा मिळाला नाही. संस्थेचे पदाधिकारी यांनी या अपचारी कर्मचाऱ्यावर काहीही कार्यवाही केली नाही, आता संस्थेने कार्यवाही करावी अन्यथा शिक्षण विभाग व गोंडवाना विद्यापीठाने कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत बबन रणदिवे यांनी केली. पत्रकार परिषदेला आबाजी धानोरकर, वासुदेव वाघमारे, प्रकाश बेजंकीवार उपस्थित होते.
                यासंदर्भात मेघा पानसरे - नलगे यांच्याशी संपर्क साधला असता संस्था आणि तक्रारकर्ते आपल्याला नाहक त्रास देत असुन केलेली चौकशी नियमबाह्य असुन मान्य नाही. या प्रकरणी व नऊ महिन्यांचे वेतनाबाबत आपण न्यायालयात दाद मागत असून न्याय मिळेल, असा विश्वास मेघा पानसरे यांनी व्यक्त केला.
 गोंडवाना विद्यापीठाकडे या संदर्भात तक्रार आली आहे. संस्थेने अद्याप याविषयी कार्यवाही केली नाही. गोंडवाना विद्यापीठाने तक्रारीची दखल घेेतली असून एका समितीचे गठन केले आहे. ही समिती प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन चौकशी करणार आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. - डाॅ. प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली 
गोंडवाना विद्यापीठाने सुचविल्या प्रमाणे चौकशी झाली आहे. याविषयी कर्मचारी चंद्रपुर न्यायालयात गेले होते, मात्र आता दोन्ही बाजूंना समजून घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.  सुधाकर कुंदोजवार, अध्यक्ष, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा. 
कोण आहेत मेघा पानसरे - नलगे 
 मेघा पानसरे या माजी जिल्हा परिषद सदस्य असुन माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामूलकर यांचे भाचे जिल्हा सहकारी बँकेचे माजी सदस्य स्व.दिलीप नलगे यांच्या पत्नी आहेत. मेघा पानसरे या काँग्रेस पक्षाच्या आक्रमक नेत्या समजल्या जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]